१८ लाख नुकसानीची भरपाई द्या, अन्यथा आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:- शहराच्या वेशीवर असलेल्या डिकसळ गावात अनेक वर्षांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे गावकरी हैराण झाले आहेत.
मंगळवारी अति उच्च दाबामुळे एका रात्रीत ४२ टीव्ही २६ फ्रीज ४९ फॅन, कुलर, मोबाईल, चार्जर व पाचशे पेक्षा अधिक बल्ब मधून जळाले असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे डिकसळ येथील रहिवाश्यांचे तब्बल १८ लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असले तरी झोपी असलेल्या महावितरण प्रशासनला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
गावकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची महावितरणने भरपाई द्यावी अन्यथा प्रशासनाविरुद्ध गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी अनेकवेळा डिकसळ गावच्या वीजप्रश्नावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापझाप झापले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अद्यापही विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही. खासदार व आमदार यांच्या आदेशालाही न जुमानण्याचे काम या निर्धास्त प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आता तक्रार तरी करायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.
Comments
Post a Comment