भिमाई आश्रमशाळेत दिवंगत रत्नाकर मखरे यांचा ७० वा जन्मदिवस साजरा

दिवंगत पँथर रत्नाकर मखरे (तात्या) हे जनसामान्यांचे चालते बोलते विद्यापीठचं:-कुमार काळे
( भिमाई आश्रमशाळेत दिवंगंत रत्नाकर मखरे यांचा ७० वा जन्मदिवस झाला साजरा)
इंदापूर:- प्रतिनिधी ( दि.९) - 
 इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर मखरे (तात्या) यांचा गुरुवार (ता.९) रोजी ७० वा जन्मदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रबोधनपर व्याख्यानात बामसेफचे राष्ट्रीय महासचिव मा. कुमार काळे सर बोलत होते.
यावेळी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेला पुत्र ॲड. राहुल मखरे व कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बुध्दपुजा भंते शांती सागर (गोरेगाव मुंबई ) यांच्या हस्ते संपन्न झाली. बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे, बाळासाहेब सरवदे उपस्थित होते.
कुमार काळे म्हणाले की, तात्या अमोघ वक्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर छाप पाडणारे, राजकीय परिपक्वता,संघर्षशील नेतृत्व,अष्टपैलू व्यक्तिमत्वाने इंदापूरकरांसह महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील.तात्यांचे कार्य मोठे व प्रेरणादायी तसेच बोधप्रद असेच होते. लोकसंपर्क दांडगा होता. अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी असायची.विशेषतः उपेक्षित,शोषित वर्गासाठी तात्यांनी तहयात संघर्ष केला.ज्यांच्या अनेक पिढ्यांचा शिक्षणाशी संबंध नव्हता, अशा उपेक्षित, वंचित वर्गाच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तात्यांनी आणले. त्यांच्यासाठी उत्तम व अद्यावत अशी शिक्षण संस्था काढली की, जिच्यामध्ये ज्ञानदाना बरोबरच शिव,फुले, शाहु,आंबेडकर ह्या महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे पवित्र काम येथील गुरुजनवर्ग करत आहे.तात्यांचा आशीर्वाद सतत नवी प्रेरणा देत राहील.लोकसेवेच्या कार्यात ते आपणा सर्वांसाठी स्फूर्तिस्थान आहेत. त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. तात्यांच्या आठवणी नेहमीच आपणास नवं बळ देत राहतील, अशा शब्दात कुमार काळे सरांनी आपल्या भावना तात्यांच्या जन्मदिनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमास माजी मंत्री मा.हर्षवर्धन पाटील व जि.प.सदस्य प्रवीण माने यांच्यासह तात्यांवर प्रेम करणाऱ्या  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्प / पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास बहुसंख्येने लोक उपस्थित होते. 
यावेळी प्रवीण माने (सदस्य जि.प.पुणे), वसंतराव साळवे, विठ्ठलराव ननवरे (मा.नगराध्यक्ष), धन्यकुमार गोडसे (पोलीस निरीक्षक इंदापूर), तानाजी धोत्रे,शकीलभाई सय्यद, गफ्फूरभाई सय्यद, अंकुश काळे, नेताजी लोंढे, बाळासाहेब वाघमारे (पुणे),  आदी वक्त्यांनी रत्नाकर मखरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ॲड. राहुल मखरेंनी शैक्षणिक संस्थेसंबंधी विद्यमान परिस्थितीचे कथन केले.
         आंबेडकरी गीत गायनाचा कार्यक्रम आंबेडकरनगर येथे सायंकाळी राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.यावेळी गायक मनोजराजा गोसावी, विनोद फुलमाळी, शाहीर राजेंद्र कांबळे, विजय सरतापे, रविराज भद्रे आदींचा सत्कार राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे व ॲड.राहूल मखरेंच्या हस्ते पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कलर मराठी वाहिनीवरील "सुर नवा, ध्यास नवा, आशा उद्याची " या कार्यक्रमातील जेतेपद विजेती इंदापूरची लेक कु.राधा खुडे हिचा विशेष सत्कार ना. भरणे व ॲड. मखरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले, तर आभार संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. समीर टिळेकर यांनी मानले. कार्यक्रमस्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली.

Comments

Popular posts from this blog