राज्यपाल भगतसिंह कोश्यारींशी अंकिता पाटील यांनी केली चर्चा 
           - पुणे येथे घेतली भेट 
इंदापूर:प्रतिनिधी दि.16/8/21
        राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी रविवारी (दि.15) पुणे येथे भेट घेतली व मागण्यांचे निवेदन देऊन विविध विषयांवरती चर्चा केली.
                 या भेटीप्रसंगी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे बाबत तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवण्याबाबत महामहिम राज्यपाल महोदय यांना अंकिता पाटील यांनी विनंती केली.
            सध्या शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु आहे. शेतकरी बांधव हे अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होतील असे कोणतेही पीक शेतात नसल्याने शेतकरी हा लगेच वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी या भेटीत केली. 
        सध्या पावसाने ओढ दिल्याने शेती पिके कोमजून  चालली आहेत. विहिरी व विंधन विहिरींच्या उपलब्ध पाण्यावरती पिके जगण्याची धडपड शेतकरी करीत असताना, वीज खंडित मोहीम सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. मात्र लोकप्रतिनिधी हे वीज खंडित मोहिमेबद्दल गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करणेबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंती भेटीत अंकिता पाटील यांनी राज्यपालांना केली. 
           तसेच कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेल्टा प्लसचे पेशंट सापडत आहेत. काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढत आहे. ग्रामीण भागातील गरोदर महिलांना सकस आहार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत आदी विविध विषयांवर यावेळी अंकिता पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेशी चर्चा झाली. या सर्व विषयात लक्ष घालू असे राज्यपालांनी नमूद केले. यावेळी अंकिता पाटील यांनी राज्यपालांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. 
_____________________________

Comments

Popular posts from this blog