भाऊंनी निस्वार्थीपणाने सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून कार्य केले - हर्षवर्धन पाटील
  इंदापूर प्रतिनिधी
 माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर महाविद्यालयातील असणाऱ्या भाऊंच्या समाधीस्थळाचे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून उपस्थित कर्मयोगी परिवारासमोर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
  यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, संस्थेचे खजिनदारॲड.मनोहर चौधरी,सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके,संचालक विलासराव वाघमोडे, आबा पाटील, पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, विष्णू मोरे उपस्थित होते.
  हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,' उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांमधून भाऊंचा सहवास लाभला आहे व त्यातूनच सर्वांना भाऊंचे व्यक्तिमत्व हे ऋषीतुल्य असल्याचा स्वानुभव आहे. आमदार, राज्यमंत्री, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून आणि त्याकाळात पालकमंत्री म्हणून तसेच खासदार म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्या पिढीतील लोक त्यांच्या कार्याचे गौरउद्गगार काढतात.भाऊंनी निस्वार्थीपणाने काम केले. काम करताना सामान्य माणूस हा आपल्या विकासाचा केंद्रबिंदू मानला.भाऊंचे हे कार्य आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जबाबदारीने हे कार्य सुरू ठेवायचे आहे. अनेक सहकारी संस्था स्थापन करून सर्वसामान्यांचा विकास भाऊंनी केला आहे. इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगती पथावर असून इंदापूरकरांना लवकरच रेडिओ (एफएम 90.4) ऐकण्याची संधी मिळणार आहे.अनेक शैक्षणिक संस्थांचे कार्य प्रगतिपथावर आहे.'
  इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती. 350 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
  जावीर सर, बनसोडे सर, जौंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल गायकांनी भक्तिभावाने भजनांचे सादरीकरण केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मानले.
   उपस्थित कर्मयोगी परिवाराने भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले भाऊंच्या कार्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog