इंदापूर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट काम - हर्षवर्धन पाटील
- उपसभापतीपदी ॲड.हेमंत नरुटे यांची निवड
- भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे
इंदापूर: प्रतिनिधी दि.11/11/21
इंदापूर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गेली साडेचार वर्षात नावलौकिक वाढेल असे उत्कृष्ट काम केले आहे. आता नूतन उपसभापती ॲड. हेमंत नरुटे हेही पंचायत समितीचा नावलौकिक वाढविण्याचे काम प्रभावीपणे करतील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.11) केले.
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड. हेमंत नरूटे यांची गुरुवारी (दि.11) बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसभापती संजय देहाडे यांनी ठरलेप्रमाणे राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या उपस्थितीत ही बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नूतन उपसभापती ॲड.हेमंत नरुटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, आगामी काळात पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांनी तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या भागात संवाद दौरे काढावेत, आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. आपल्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची उद्घाटने, भूमिपूजने यांचे आयोजन करावे. काही ठिकाणी आम्हीही सहभागी दौऱ्यात होऊ.
कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांची शिकवण व संस्कार सर्व कार्यकर्त्यांवर आहे. परिणामी साडेचार वर्षे पंचायत समितीचे कामकाज सुरळीत पार पडले. आता आगामी निवडणुकीत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम राहील, असा विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, नूतन उपसभापतीपदी ॲड.हेमंत नरुटे, मावळते उपसभापती संजय देहाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप नेते मारुतीराव वनवे, देवराज जाधव, माजी सभापती करणसिंह घोलप, रघुनाथ राऊत, माऊली चवरे, सत्यशील पाटील, गजानन वाकसे, महेंद्र रेडके व सर्व पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी मानले.
फोटो :- इंदापूर पंचायत समिती सभागृहात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निवडीबद्दल उपसभापती ॲड.हेमंत नरुटे यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment