इथेनॉल दरवाढीचा निर्णय स्वागतार्ह - हर्षवर्धन पाटील
- केंद्र सरकारचे केले अभिनंदन
इंदापूर: प्रतिनिधी... धनश्री गवळी इंदापूर माय मराठी न्यूज.
केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरवाढीचा व पेट्रोलमध्ये सन 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा घेतलेल्या धोरणात्मक निर्णय हा साखर उद्योगासाठी दिलासादायक व स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.11) व्यक्त केली.
साखर उद्योगाला दीर्घकालीन असा आधार देणारा हा निर्णय घेतलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बुधवारी (दि.10) झालेल्या बैठकीत साखर हंगाम सन 2021-22 साठी सदरच्या दरवाढीस मंजुरी देण्यात आली. या वाढीमुळे आता इथेनॉलला बी - हेवी मोलासिस - रु.46.66, सी - हेवी मोलासिस - रु.59.08, ऊसाचा रस - रु.63.45 प्रति लिटर असा मिळणार आहे. सदरची वाढ ही प्रतिलिटर 1 रुपया 47 पैसे पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना किमतीमध्ये स्थिरता मिळणार आहे. साखर उद्योगाबरोबरच मका, भात, बिट आदीं पासूनही इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे, त्यामुळे या दरवाढीचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ साखर उद्योगापुढील अडचणी दूर करण्यासाठी नुकतेच भेटले होते. त्यानुसार साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जात आहेत, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
____________________________
Comments
Post a Comment