ज्यांच्यासाठी लिहताना शब्दही कमी पडतील अशा आमच्या काकी ....
उपेक्षित,वंचित,निराधारांचा आधार... ....शकुंतला मखरे काकी..
कर्तृत्वशालीन आयु.शकुंतला रत्नाकर मखरेंच्या ( काकी) ६६ व्या वाढदिवसानिमित्त.. !!
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाई, माता भिमाई ह्या महामातांना आदर्श मानून, त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या, दिन- दुबल्यांचे अश्रु पुसणाऱ्या, शांत, संयमी, कुटुंबवत्सल, प्रसंगी आक्रमक, स्पष्टवक्त्या, सडेतोड वृत्ती आणि निर्भिडपणा हा बाणा असलेल्या आदरणीय काकींना जन्मदिनी मंगलमय शुभेच्छा ..!
जनमानसात काकी म्हणून परिचित असलेल्या, परंतु आम्हा सर्वांच्या आक्का यांचा जन्म १४ जानेवारी १९५६ रोजी हिंगणगाव ता.इंदापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव श्री. महादेव सदू जगताप हे होते. ते प्रगतशील शेतकरी होते.त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यांना पोहण्याचा छंद होता. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला त्याकाळी ते बैलगाडीने धान्य देत असायचे. त्यांच्या कुटुंबाची दातृत्वाची भावना होती. काकींनी इ. ७ वी. पर्यंत शिक्षण घेतलं. आणि पुढे इंदापूर येथील हरहुन्नरी आणि वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या रत्नाकर मखरे (तात्या) यांच्याशी त्या दि.२६ मे १९७४ रोजी विवाहबद्ध झाल्या.
लग्नानंतर वर्षभरात अचानक तात्यांना टीबी सारखा दुर्धर असा आजार झाला. तात्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. औषध पाण्याची हेळसांड झाली. अशा वेळेस आक्कांनी धीर धरला, तात्यांची साथ सोडली नाही. पत्नीचं कर्तव्य बजावलं. काकींनी मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. तसेच काकींच्या तीनही सुना ह्या उच्च शिक्षित आहेत. काकींना मुलगी नाही,त्यामुळे सुनांना स्वतः च्या मुलींसारखी वागणूक देतात. त्या काळात महिला राजकारणात फारशा उतरत नव्हत्या. परंतु ज्यांना काळाच्या भाळावर नाव कोरायचं असतं त्यांना काळ कधीच आडवा येत नाही. तर कर्तृत्ववान माणसाचे स्वागत करण्यासाठी काळ सुद्धा सज्ज होऊन उभा राहत असतो. काकींनी नगरसेविका पदापासून राजकारणाचा आरंभ केला. राजकारण हे व्यक्तिगत लाभासाठी नसून ते समाज हितासाठी आहे, अशी ज्यांची धारणा चांगली असते. त्यांचे धोरणेही निश्चित चांगले असते. म्हणूनच आपल्या मातीशी नाळ असलेल्या काकींनी महिलांसाठी त्यांच्या हितासाठी विविध योजना आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आणल्या. इंदापूर शहरातील आंबेडकर नगर, साठेनगर व परिसरातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हाव्यात म्हणून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना काकींनी आधार दिला. निराधार, वृद्ध महिलांना मदत करणारी व मायेची सावली देणारी निराधारांची माय.. काकी. सर्वांनाच हे दातृत्व, कर्तृत्व भगवंत देत नाही, पण अशी काही माणसं काकींच्या रूपात क्वचित सापडतात. अंधाराला चिरून वर आलेल्या या लेकीनं संघर्ष नुसता झेलला नाही, तर पेललाय..
अनेक चढ-उतार पाहिले ज्यांच्या पापणीआड सामान्य माणसाच्या वेदना असतात. काकीच्या नजरेत जशी जरब आहे. तसाच करूणा भावही आहे. कणखर मनाच्या तळाशी वात्सल्यही आहे.दिवंगत तात्यांसारख्या यशस्वी पुरुषामागची एक शक्ती म्हणजे काकी. आम्हां सर्वांची प्रेरणा, कोणाही सामान्याची काळजी करणारी आई आहे.
काकींनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. यशाची शिखरे अनुभवले आहे.. मानसन्मान मिळाले आहेत.तात्यांच्या पश्चात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची धूरा सक्षमपणे पेलत आहेत. शाळेतील मुला- मुलींचे आपण पालक आहोत,याचे भान प्रत्येक वेळी स्वतः जपताना आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही देत असतात. वसतिगृहातील सुखसोयी, जेवण, स्वच्छता या आणि अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टींवर कटाक्षाने आक्कांचे लक्ष असते.वसतिगृहात राहणारी मुलं-मुली हे आपले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, याबाबत कर्मचाऱ्यांना सदैव सूचना देत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडी-अडचणी सोडविण्यात आदरणीय काकी सदैव तत्पर असतात. संस्थेतील कोणत्याही कर्मचाऱ्यावर विनाकारण चिडताना मी अक्कांना आजवर पाहिले नाही.प्रत्येकाच्या कुटुंबाची आस्तेने विचारपूस करून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. अशा ह्या मनमिळावू स्वभावाच्या आणि प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या आदरणीय काकींना मी गेली अनेक वर्षापासून अगदी जवळून पाहतो आहे.
समाजात वावरताना कुटुंब आणि समाजकारणातही त्यांनी आपला एक वैशिष्ट्यपूर्ण आगळा वेगळा ठसा उमटवला आहे.तात्यांच्या पश्चात काम करत असताना दगदग होत असूनही न थकता न कंटाळता त्या अजूनही अत्यंत सक्षमपणे आणि कार्यतत्परतेने आपली जबाबदारी अविरतपणे पार पाडताना दिसतात. जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी येतात,ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या. शांत राहून निर्णय घेण्याची कला काकींकडून समजून घ्यावी. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे असायला हवे "हम भी किसी से कम नही !" हा विश्वास नेहमी काकी महिलांच्यामध्ये जागवत असतात . एक उत्तम गृहिणी असलेल्या काकी
कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलताना दिसून येतात.
काकींनी स्व-मालकीची जमीन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टला दिली असून, त्या जागेत भव्यदिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नावाने एक सुसज्ज असे शैक्षणिक संकुल दिमाखात उभे आहे. हे शैक्षणिक संकुल उभे राहण्यामागे काकींचे मोलाचे योगदान आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक संकटे वादळासारखी आली. पण काकी खचल्या नाहीत. ज्या झाडांची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात ती वादळातही भक्कमपणे उभी असतात. काकींनी वादळांनाही ताकदीने शांत केलं.आपल्या पतीकडून मिळालेल्या राजकीय डावपेचांचा वापर त्या मोठ्या हिंमतीने करतात.
आदरणीय काकी, सुगंधी...तुमचे जगणे चंदन....
किती फाटक्या छतांना.... दिले तुम्ही तारांगण..
अशा संघर्षयात्री कर्तृत्वशालीन काकींना कृतज्ञतापूर्वक सलाम.निरामय आरोग्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा !!
आपलाच, नानासाहेब सानप.
Comments
Post a Comment