सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रत्येक क्षण बहुजन समाजाप्रती समर्पित :- ॲड. समीर मखरे
 इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी.
 विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन , महिलांना शोषणापासून मुक्त करणे तसेच बहुजन, मागासवर्गीय महिलांना शिक्षित करणे यासारखे महत्त्वाचे कार्य करत सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजातील महिला आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षास समर्पित होता,असे गौरवोद्गार जयंती दिनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी काढले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती दिनी कार्यक्रमाचे आयोजन
भिमाई आश्रमशाळेत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार,तथागत गौत्तम बुध्दांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सृष्टी लोखंडे (११ वी), प्रतिक्षा घोडके (८ वी), शुभांगी गिरी (९वी),शीतल कचरे (६वी),प्रीती विटकर, मानसी गायकवाड( ७ वी) या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुलेंचा  जीवनपट भाषणांतून सांगितला.काही मुलींनी "माय सावित्री, तू महान फुलविला क्रांतीचा मळा".व "कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली" .हे गीतं सामूहिकपणे सादर केली.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे अंतर्गत आस्तित्व लोक संचलित साधन केंद्र जंक्शन यांच्या सौजन्याने सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचे औचित्य साधून येथील शालेय विद्यार्थ्यांना टिकाऊ  आणि मजबूत सुती पिशव्यांचे वाटप केंद्राचे व्यवस्थापक संदिप भोसले,नगरपालिकेचे क्षेत्रीय समन्वयक विजय चितारे यांच्या हस्ते करण्यात आले. या मान्यवरांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांनी केला.
 यावेळी संदिप भोसले म्हणाले की, महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख महिला संघटित होऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी,त्यांच्यात आर्थिकसुबत्ता यावी, महिलांना रोजगार निर्मितीसाठी १०० कोटींचे कर्ज वाटप केले असून महाराष्ट्र भर बचत गटांच्या माध्यमातून चांगले काम सुरु असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, (डोनाल्ड) दीपक मगर, प्राचार्या अनिता साळवे व विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. हिरालाल चंदनशिवे सर यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog