- कार्यालयाची कर वसुली उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल
इंदापूर प्रतिनिधी .. धनश्री गवळी माय मराठी न्यूज..
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास गुणवत्तेचे आय.एस.ओ. 9001:15 प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे, त्यामुळे कार्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच कार्यालय हे महसुली कर वसुलीत आघाडीवर असून, मार्चअखेरपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण होईल, अशी माहिती बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी दिली.
आयएसओ 9001:15 या प्रमाणपत्राची मुदत सन 2025 पर्यंत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज गतिमान असून,लायसन्स व इतर कागदपत्रे नागरिकांना 7 ते 8 दिवसात स्पीड पोस्टाने घरपोच मिळत आहेत. त्यासाठी नागरिकांनी पत्ता व पिन कोड अचूक नोंदवावा, असे आवाहन नंदकिशोर पाटील यांनी केले आहे.
वाहनांचे अपघात कमी व्हावेत होऊन परिवहन विभागाकडून दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वैद्य कागदपत्रे जवळ बाळगावी. तसेच सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम बारामती, इंदापूर तालुक्यात चालू असल्याने अपघात घडू नयेत म्हणून वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहनही नंदकिशोर पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले की,बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आजअखेर कर उद्दिष्टपूर्तीचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण केले आहे. मनुष्यबळ कमी असतानाही अपघात टाळण्यासाठी कार्यालय विविध उपाययोजना करीत आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या सुमारे 100 ट्रॅक्टरवर कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कार्यालयाकडून थकित कर वसूली मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे. वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावलेली असल्यास कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेट, सीटबेल्ट वापरून अनावश्यक दंड टाळावा. त्याचबरोबर वाहनधारकांनी कर वेळेवर भरणा करावा व प्रमाणपत्राचे नुतनीकरण वेळेवर करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी राजेंद्र केसकर यांनी केले.
चौकट :-
बारामती आरटीओकडे स्पीड गन मशीन
-------------------------------------------
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे
स्पीडगन मशीन उपलब्ध झाली असून, त्याद्वारे वेगाने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी वाहने सावकाश चालवून अपघात व दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहनही सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी केले आहे.
____________________________
Comments
Post a Comment